अकोला – अकोल्यातील गोरक्षण मार्गावरील माधव नगर स्टॉपपासून ते संत तुकाराम चौकापर्यंतच्या रस्त्यावर गेल्या पाच वर्षांपासून पथदिवे लागलेले नाहीत. तसेच संत तुकाराम चौकापासून मलकापूर पर्यंत सुद्धा पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. या अंधारलेल्या रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काल रात्री सागर मोहोड यांच्या नेतृत्वात आगळेवेगळे दिवे लावून निषेध आंदोलन केले.
गोरक्षण मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. हे काँक्रिटीकरण आचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर नेहरू पार्क चौकापासून ते माधवनगर स्टॉपपर्यंत या मार्गावर दिवे लावण्यात आले.परंतु माधव नगर स्टॉपपासून ते संत तुकाराम चौकापर्यंत गेल्या पाच वर्षांपासून पथदिवे लागलेले नाहीत. तसेच संत तुकाराम चौकापासून मलकापूर पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक महिने झाले,तरी या मार्गावरही पथदिवे लागलेले नाहीत. त्यामुळे रात्री या मार्गावर अंधार असतो. या अंधारामुळे अनेक वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागले.रात्रीच्या वेळी सायकलने किंवा चालत जाणाऱ्या नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. याबाबत वारंवार नागरिकांनी संबंधित नगरसेवक व महापालिकेकडे पाठपुरावा केला, परंतु गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावर असलेला रात्रीचा अंधार अद्याप संपला नाही. त्यामुळे काल रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सागर मोहोड यांच्या नेतृत्वाखाली माधवनगर स्टॉप ते संत तुकाराम चौक या मार्गावर दिवे लावून निषेध आंदोलन करण्यात आले.या आगळ्या-वेगळ्या आंदोलनात नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला होता.