मुंबई – गुजरातची क्षमा बिंदू स्वतःशीच लग्न करणार, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. हे कसं शक्य आहे, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला, तिच्या लग्नाला विरोध झाला. मात्र आता पोरीने करून दाखवलं, असं म्हणायला हरकत नाही. गुजरातच्या २४ वर्षीय क्षमाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बुधवारी तिने स्वतःशीच लग्नगाठ बांधली. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच विवाहसोहळा असल्याचे म्हटले जात आहे.
क्षमाने यापूर्वी ११ जून रोजी ती लग्न करणार, अशी घोषणा केली होती. मात्र, वाद टाळण्यासाठी तिने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस आधीच आपलं लग्न उरकून घेतलं. कारण तिला तिच्या खास दिवसात कोणतेही विघ्न नको होते. तिचं लग्न आधी मंदिरात पार पडणार होतं, मात्र भाजपा नेत्यांच्या विरोधानंतर तिने घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवाय पंडितांनीही हे लग्न लावण्यास नकार दिला होता. त्यामुळे टेपवर मंत्र वाजवून अत्यंत पारंपरिक पद्धतीने क्षमाचा विवाह पार पडला. यावेळी तिच्या खास मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचा विधी आणि मेहेंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.