नवी दिल्ली- भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत अग्निवीरांची निवड केली जाणार आहे. सदर योजनेला उत्तर भारतासह अनेक राज्यांत तरुण आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशात याच्या विरोधात हिंसक आंदोलने झाली. असे असतानाही अग्नीवीर भरतीसाठी सुरू झालेल्या नौदलातील भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यात 82 हजारापेक्षा जास्त महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीसाठी बुधवारपर्यंत एकंदर 9 लाख 55 हजार अग्निवीर अर्जदारांनी नोंदणी केली, अशी माहिती नौदलाने दिली. तिन्ही दलांत कर्मचारी पदे यंदा प्रथमच महिलांसाठी खुली झाली आहेत.
अग्निवीरच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणी झालेल्या आंदोलनांमुळे या योजनेबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र भारतीय नौदलाने वरिष्ठ माध्यमिक आणि मॅट्रिक भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली. या योजनेअंतर्गत महिला खालाशांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी बुधवार 3 ऑगस्ट 2022 ही शेवटची मुदत होती. या तारखेपर्यंत नौदलाकडे 9 लाख 55 हजार अग्निवीर अर्जदारांनी नोंदणी केली. त्यात 82 हजार महिला उमेदवार आहेत. नौदलाने अधिकृत ट्विटल हँडलवर ही माहिती दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलात महिला अधिकारी आहेत. मात्र कर्मचारी पदावर पहिल्यांदाच महिलांची नेमणूक केली जात आहे. अग्निपथ योजनेतून अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. त्यात महिला खलाशी नेमले जाणार आहेत, असे कार्मिक प्रमुख व्हाईस एडमिनल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले. अग्निवीरांची पहिली बॅच नोव्हेंबरमध्ये नौदलात दाखल होईल. नौदलात 30 महिला अधिकारी आहेत. त्या विविध जहाजांवर तैनात आहेत. मात्र आता खालाशी पदावरही महिलांची भरती केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर पासून पहिले नौदल अग्निवीर प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यात पुरुष आणि महिला दोन्ही अग्निवीरांचा समावेश असेल, असे त्रिपाठींनी सांगितले.