पुणे- आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे डिवाळखोरीत निघालेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्या कर्ज खात्यातील पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथील ५ हेक्टर ५२ गुंठे जमिनीचा लिलाव झाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ही जमीन ६० कोटी ४१ लाख ७४ हजार ७०९ रुपयांना विकत घेतली, अशी माहिती सहकार उपनिबंधक आणि बँकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.
नियमबाह्य कर्ज वाटप आणि थकीत कर्जे यामुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडली. बँकेला डिवाळखोर म्हणून जाहीर केले. संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. बँकेच्या थकीत कर्जांची वसुली सुरू झाली आहे. त्यात बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले यांनी कर्ज काढून पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील कोरेगाव येथे जमीन खरेदी केली होती. त्यांनी कर्जाची परतफेड केली नसल्यामुळे या जमिनीचा लिलाव केला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ती जमीन लिलावात ६० कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांना विकत घेतली. या लिलावासाठी बाजार समितीने एकमेव बोली लावली होती. त्यानुसार ५ हेक्टर ५२ गुंठे जमीन बाजार समितीला लिलावात मिळाली. यामुळे बाजार समितीला जागेची भासणारी कमतरता नाहीशी होईल, असे समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले.