नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरुद्ध कथित भडकाऊ भाषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणी याचिकेवर सोमवारी १३ जूनला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. माकप नेत्या वृंदा करात यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे.
२०२० मध्ये केलेल्या कथित चिथावणीखोर भाषण प्रकरणी अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीची याचिका वृंदा करात यांनी न्यायालयात दाखल केली होती. ऑक्टोंबर २०२१ मध्ये न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवर न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. २५ मार्च २०२२ रोजी न्यायालयाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.