न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विमानाची शिडी चढत असताना बायडेन पुन्हा लडखडल्याचे पण हाताचा आधार घेऊन त्यांनी स्वतःला सावरल्याचे दिसते आहे. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. एका टीव्ही मुलाखतीसाठी बायडेन लॉस एंजेलिस येथे जात होते. त्यांच्या खास एअरफोर्स वन विमानाच्या शिडीवरून चढताना त्यांचा तोल गेला पण हात टेकून ते पुन्हा उठल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यापूर्वी २०२१ मध्ये त्यांचा असाच अपघात झाला होता, तेव्हा ते अटलांटा दौऱ्यावर जात होते. तिथे ते आशियाई अमेरिकी समुदायातील नेत्यांशी चर्चा करणार होते. तेव्हा विमानाची शिडी चढताना बायडेन तीनवेळा कोलमडले होते. बायडेन हे अमेरिकेच्या सत्तेवर असलेले सर्वात बुजुर्ग नेते आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये ते ८० वर्षांचे होत आहेत.
२० जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव केला होता. बायडेन यांचे असे अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत ज्यात ते कधी बोलता बोलता झोपी गेल्याचे, लोकांचे नाव विसरल्याचे, चुकीच्या नावाने लोकांना संबोधताना दिसले आहेत. बायडेन विसराळू आहेत आणि अनेकदा त्यांची ट्रेन यामुळे चुकल्याचे अनेक लोक सांगतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये सुद्धा ते जवळ जवळ झोपले असल्याचेही दिसले होते.