वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सायकलवरून पडल्याची घटना घडली आहे. अमेरिकेतील डेलावेअर राज्यात सायकल चालवत असताना बायडेन यांचा पाय पॅडमध्ये अडकून ते पडले. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. बायडेन सायकलवरून पडताच त्यांचा स्टाफ त्यांना उचलण्यासाठी पुढे सरसावला. या घटनेचा व्हिडिओ माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने ट्विट केला आहे.
काल शनिवारी १८ जून रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आपली पत्नी जिल बायडेनसोबत डेलावेअर राज्यातील रेहोबोथ बीचवर वीकेंड एन्जॉय करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी इतरांसोबत सायकल चालवण्याचा आनंद लुटला. त्यांना पाहण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक रेहोबोथ बीच येथील केप हेन्लोपेन स्टेट पार्कमध्ये पोहोचले होते.
त्यावेळी सायकल चालवताना बायडेन यांचा पाय पेडलमध्ये अडकला आणि ते अडखळून पडले. बायडेन यांनी सायकल चालवताना टी-शर्ट, शॉट्स आणि हेल्मेट घातले होते. ते सायकलवरून पडताच त्यांच्यावर पहारा देणाऱ्या रक्षकांनी त्यांना घेराव घातला आणि उठण्यास मदत केली. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने बायडेन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.