सुरत : अरबी समुद्रात एक व्यापारी जहाज बुडल्याची घटना बुधवारी ६ जुलै रोजी घडली. या बुडणाऱ्या जहाजातील २२ जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात बुडणाऱ्या एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व २२ क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्यांपैकी २० भारतीयांसह १ पाकिस्तानी आणि १ श्रीलंकेचा नागरिक आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना भारतीय तटरक्षक दलाचे जहाजे आणि हेलिकॉप्टरद्वारे पोरबंदर बंदरात आणले जात आहे. भारतीय तटरक्षक दलाचे जहाजे आणि एएलएच ध्रुव पोरबंदर येथून रवाना करण्यात आले होते. ज्यांच्या साहाय्याने समुद्रात ९३ नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यात आले, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे.