भोपाळ – आईने आपलं १५ दिवसांचं नवजात बाळ विकून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन खरेदी केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोनजण सध्या फरार आहेत. लवकरच फरार आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीला त्यांच्या बळावर संशय होता, त्यामुळे त्याला तिचा गर्भपात करायचा होता. मात्र वेळ कमी असल्याने त्यांनी दलालांमार्फत मूल विकण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी त्यांचं बाळ देवास येथील एका जोडप्याला विकलं. तर, ज्यांनी हे बाळ विकत घेतलं त्यांनी सांगितले की, ‘अलीकडेच त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनी हे बाळ साडेपाच लाखांना विकत घेतले.’
संतापजनक म्हणजे मुलाची विक्री केल्यानंतर जन्मदात्या आई वडिलांनी मिळालेल्या पैशातून टीव्ही, फ्रीज, कुलर आणि वॉशिंग मशीन या वस्तू खरेदी केल्या होत्या. या सर्व वस्तू आता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच याप्रकरणी आरोपी आई शायना बी हिच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.