मुंबई – आता नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला अधिकचे पैसे भरावे लागणार आहेत. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी नवे सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १ हजार ४५० रुपये मोजावे लागत होते, त्यात आता ७५० रुपये अधिक म्हणजेच २ हजार २०० रुपये द्यावे लागणार आहेत. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
तसेच आता दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर १ हजार ५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. म्हणजेच, ४ हजार ४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. तर, रेग्युलेटरसाठी आता १५० रुपयांऐवजी २५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच ५ किलोच्या सिलेंडरची सिक्युरिटी आता ८०० ऐवजी १ हजार १५० रुपये करण्यात आली आहे. दरम्यान, शेगडी घ्यायची असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. या वाढत्या महागाईमुळे लोक हैराण झाले आहेत.