पुणे – पावसाळी संसर्गजन्य आजारांच्या तातडीच्या निदानासाठी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने एक मल्टीप्लेक्स आरटी-पीसीआर निदान कीट बाजारात आणले आहे. मायलॅबने पुण्यात गुरुवारी ‘एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनल’च्या लॉन्चची घोषणा केली. हिवताप, चिकनगुनिया, डेंग्यू, झिका, लेप्टोस्पायरोसिस आणि सालमोनेलोसिस जीवाणू प्रजाती तसेच लेशमॅनियासिस परजीवी यांचे नेमके निदान एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनलमुळे शक्य होते. या संयुक्त टेस्ट किटच्या सहाय्याने नमुन्यातील आजाराचा शोध अवघ्या दोन तासांत लागू शकतो.
उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झाल्यावर पावसाच्या सरींनी मन सुखावते परंतु सतत काही दिवस पाऊस पडला की तो नकोसा वाटू लागतो. चिखल आणि सततची रिपरिप यामुळे पावसाळ्याला लोक कंटाळू लागतात. शिवाय पावसाळा आणि आजारपण हे समीकरणही ठरलेले असते. या काळात डास चावल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. तसेच पचनासंबंधित आजारही होतात. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. मुख्य म्हणजे पावसाळी आजारांचे वेळेत निदान न झाल्यामुळे उचाराअभावी जगभरात अनेकांना प्राण गमवावे लागतात. हेच लक्षात घेऊन या मल्टीप्लेक्स आरटी-पीसीआर निदान कीटची निर्मिती करण्यात आली आहे. मायलॅबचे संस्थापक हसमुख रावळ यांनी सांगितले, ‘डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरीया, झिका, लेप्टोस्पायरोसिस, सालमोनेलोसिस इत्यादी रोगाणूजन्य किंवा साथीच्या आजारांचा मुख्य धोका भारताला आहे. कारण अचूक आणि विश्वासार्ह निदान पद्धतींच्या कमतरतेमुळे अशा अनेक आजारांचे अचूक निदान हे महत्त्वपूर्ण आव्हान ठरते. एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनल उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे आम्ही मोसमी साथीच्या आजार निदानात आमूलाग्र बदल आणला आहे.’ तसेच प्रयोगशाळेच्या संचालक सुक्ष्मजीवशास्रज्ञ डॉ. सुमेधा चौधरी म्हणाल्या, ‘अगदी सुरुवातीला आणि अचूक निदानाकरिता एक्सटेंडेड मान्सून फिव्हर पॅनल सर्वप्रकारच्या पावसाळी आजारांचे अचूक निदान करण्यात लाभदायक आहे आणि उपचार योग्य पद्धतीने सुरू करण्यासाठी मदतीची ठरते.’