नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमधील तणाव काही कमी होण्याचे नाव घेत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वन महोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार होते, मात्र आता त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आज सांगितले. शनिवारी रात्री दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांचे फोटो असलेले बॅनर लावले आणि आप सरकारचे बॅनर फाडले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच दिल्ली पोलिसांनी लोकांना मोदींचे फोटो असलेल्या बॅनरला हात लावू नका, अशा सूचना दिल्याचेही त्यांनी म्हटले.
पत्रकार परिषद घेऊन राय म्हणाले, ‘पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी हे कृत्य केले. काल रात्री दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. त्यांनी जबरदस्तीने पंतप्रधान मोदींचे फोटो असलेले बॅनर लावले आणि आप सरकारचे बॅनर फाडले. केजरीवाल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र आता त्यांनी यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल सरकारचा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या सरकारने राजकीय कार्यक्रमात बदलला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.’ तसेच आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून मोदी हे केजरीवाल यांना घाबरतात हे या घटनेवरून दिसून येत असल्याची टीका राय यांनी केली. दरम्यान, या सर्व आरोपांवर दिल्ली पोलीस किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.