मुंबई – ‘इंडियन प्रीमियर लीग २०२२’ स्पर्धेतील क्रिकेटचे सामने २६ मार्चपासून सुरू होणार आहेत. यावेळी १० संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे. त्याचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्रात खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी स्टेडियम क्षमतेच्या ४० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.
शनिवार २६ मार्च २०२२ पासून सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी गुरुवारी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत स्पर्धेतील सामने, प्रेक्षकांची उपस्थिती आणि इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. स्पर्धेत यावेळी लखनऊ सुपरजॉईंट आणि गुजरात टायटन्स हे दोन नवे संघ खेळणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये एकंदर ७४ सामने होणार आहेत. त्यातील ५५ सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. काही सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहेत. वानखेडे आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २० सामने, तर गहुंजे आणि ब्रेबॉर्नवर प्रत्येकी १५ सामने होणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार या सामन्यांसाठी क्षमतेच्या ४० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. मात्र या सामन्याचे निश्चित ठिकाण ठरलेले नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार मुंबईत ५५ आणि पुण्यात १५ सामने होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.