मुंबई – आरे परिसरात आज पुन्हा एकदा मेट्रो कारशेडच्या कामाला प्रारंभ झाला. त्यासाठी सध्या पोलीस संरक्षणात आरे परिसरातील मुख्य रस्त्यावरील झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र आरेमधील कारशेडसाठी एकाही झाडाची कत्तल करावी लागणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांचा हा दावा साफ खोटा ठरल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. यावरून पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरे परिसरातील कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवल्यानंतर त्यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मेट्रो-3 च्या बोगीज आरेमध्ये आणण्यासाठी कोणताही अडथळा होऊ नये यासाठी झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी आरे परिसरात जाणार्या सर्व प्रवेश मार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. फक्त आरे परिसरातील रहिवाशी तेथे सोडले जात आहे. इतर कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही आहे. काही पर्यावरणप्रेमी आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या असून त्यातील काहीजणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई मात्र, पुढील 3 ते 4 दिवस पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रकात सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत आरेतील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, आरे मार्गे पवईला जाणार्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याच्या परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आरे कारशेडचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.