मुंबई – मुंबईतील आरे जंगलात उभारण्यात येणार्या मेट्रो कारशेडच्या विरोधात पर्यावरणवाद्यांनी आज आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या आरे मेट्रो कारशेडसंदर्भातल्या निर्णयावर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरेंनी म्हणाले, आम्ही केलेली कामे ही मुंबईच्या हिताची होती. महाविकास आघाडी सरकार मुंबईची काळजी घेणारे होते, आरेत आम्ही ८०८ एकर जंगल म्हणून घोषित केले. आम्ही आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले. अंतर्गत रस्ते पाठपुरावा करून आम्ही जंगलात घेतले नाहीत आणि रस्ते काँक्रिटीकरणात एकही झाड तोडले नाही. आरेतून मेट्रो कारशेड हलवून ते कांजुरमार्गला नेण्याचेही प्रयत्न केले. आम्ही कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार केला होता. आरे हे जंगल आहे. येथे फक्त झाडांचा प्रश्न नाही तर बायोडायव्हर्सिटी आहे, बिबटे, रानमांजर, खवलेमांजर असे विविध प्राणी येथे आहेत. आम्ही जंगल वाचण्यासाठी केंद्रालाही विनंती केली. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हे मी आधीही सांगितले होते. नवीन सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधातला आहे. आरेवर राग ठेवून या सरकारने कारशेड मध्येच उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचा प्रत्येक महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी होता. या निर्णयांना स्थगिती देऊन नुकसान त्यांचेच होणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.