मुंबई – आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 14 जुलै 2022 दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलीच्या रिंगण सोहळ्यासाठी 8 जुलैला 200 खास एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे 2 वर्षांपासून पंढरपूरची आषाढी यात्रा बंद होती. मात्र यंदा आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या सोयीसाठी एसटीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावतीसह इतर आगारांमधून या जादा बसची सोय केली आहे. पंढरपूरला जाणार्या भाविकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी अहोरात्र काम करत आहेत, अशी माहिती परब यांनी दिली. पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे.