पंढरपूर – कोरोनामुळे निर्बंधात अडकलेली आषाढी यात्रा यंदा दोन वर्षांनंतर प्रथमच विक्रमी होणार आहे.तसेच या पालखी सोहळ्यांसोबत चालणार्या भाविकांच्या संख्येत तब्बल 40 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी व्यक्त केला आहे. यंदा 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
या आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकर्यांनी माऊलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली. यंदा जेजुरीला नवीन तळावर पालखी उतरणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणीची पाहणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर होत असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीची जागाही रस्त्याच्या कामात गेल्याने या जागेबाबत पर्यायांची माहिती घेतली. एकंदर पालखी मार्गावर यंदा वारकर्यांसाठी चार पदरी रस्ता बनल्याने भाविकांची चांगली सोय झाली असून मार्गात येणार्या किरकोळ अडचणी प्रशासनाला सांगण्यात आल्याचे ढगे यांनी सांगितले. तसेच रस्त्याच्या कामामुळे शेकडो झाडे कापली गेल्याने वारकर्यांना दुपारी भोजनाच्या वेळी सावलीसाठी ग्रीन नेट बांधण्याची विनंती करणार असल्याचे ढगे यांनी सांगितले.