अमरावती- बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात अमरावती कोर्टाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले आहे. वॉरंट जारी होताच अमरावती पोलीस रवी राणा यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राणा घरी नसल्याने हे वॉरंट कुणी स्वीकारले नसल्याचे समजते आहे.
अमरावतीतल्या एका चौकात पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बेकायदेशीर असल्याचे सांगत पालिकेने तो रातोरात हटविला होता. त्यानंतर राणा दांपत्य चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी कार्यकत्यार्र्ंसह जोरदार आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती. तेव्हापासून मनपा आयुक्त आष्टीकर आणि राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु होते. याचेच रुपांतर पुढे शाईफेक प्रकरणात झाले. शाईफेक प्रकरणी आ. रवी राणांविरोधात कलम 353, 307 अंतर्गत राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता याच प्रकरणात अमरावती कोर्टाने रवी राणांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. दरम्यान, याबाबत बोलताना रवी राणा म्हणाले की, अमरावती व मुंबई पोलीस माझ्या खार येथील राहत्या घरी गेले. मात्र मी तेथे नसल्याने ते मला अटक करु शकले नाहीत. भाजपाला मतदान करु नये यासाठी हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. दबावाला बळी पडणार नाही.