दिल्ली – सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महागाईच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. खास करून इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यसभेतील विरोधी खासदारांच्या भावना अधिक तीव्र आहेत. त्यातूनच या मुद्यावर व्यापक चर्चा व्हावी यासाठी द्रमुकचे खासदार तिरुचि शिवा यांनी नियम २६७ अंतर्गत राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
गेल्या चार महिन्यात तब्बल १५ वेळा पेट्रोलियम पदार्थांवर दरवाढ झाली पण सरकार मात्र दोनवेळा करण्यात आलेल्या इंधन कपातीचा सतत ढोल वाजवत आहे आणि सततच्या दरवाढीबद्दल काहीच बोलायला तयार नाही. वास्तविक इंधनावरील दरवाढीमुळेच देशात महागाईचा भडका उडाला आहे, असा आरोप शिवा यांनी केला आहे. तसेच इंधनदारवाढीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा व्हायला हवी होती पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच आपण इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे, असे शिवा यांनी सांगितले. त्यामुळे शिवा यांचा हा स्थगन प्रस्ताव राज्यसभेत कधी चर्चेला येतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे.