औरंगाबाद – शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या आमदारासमोर आता निवडणुकीचे मोठे आव्हान आहे.कारण विधानसभेच्या निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बंडखोरांना आपले वर्चस्व राखावे लागणार आहे. त्यामुळे येत्या चार ऑगस्ट रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील वडगाव कोल्हाटी – बजाज नगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. शिवसेनेतील बंडखोरी नंतर हि पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
बंडखोरांना ग्रामपंचायीच्या निवडणुकी पासून विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत धडा शिकवायचा या निर्धाराने शिवसेना या निवडणुकीत उतरली आहे.
त्यामुळे शिंदे गटाचे काही नेतेही या निवडणुकीत शिरसाट यांच्या मदतीला उरले होते. . शिरसाट यांच्या मतदार संघातील हि ग्रामपंचायत कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा सेनेनेहि निर्धार केला आहे. त्यासाठी स्वतः सेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे. तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेऊन जबरदस्त प्रचार सुरु केला होता . मागील वेळेस संजय शिरसाट यांच्या पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या पण यावेळी त्यांना एकही जागा जिंकू द्यायची नाही असा निर्धार शिवसेनेने केला आहे. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना नेते घरोघरी जाऊन प्रचार करीत होते तर शिंदे गटाच्या उमेदवारासाठी स्वतः शिरसाट आणि त्यांचे कुटुंबीय प्रचार करताना दिसत होते मात्र शिंदे गटाचा कुणीही मोठा नेता या निवडणुकीच्या प्रचाराकडे फिरकला नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिंदे आणि भाजप सतत एकत्र असले तरी इथे मात्र स्वतंत्र निवडणूक लढवीत आहेत त्यामुळे इथे चौरंगी लढत होत आहे.