लाहोर – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी रमीझ राजा यांची नियुक्ती झाल्यापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंमध्ये सकारात्मक बदलामुळे उत्साह निर्माण झाला आहे. तसेच रमीझ राजा यांनी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनाही शिस्तीचे धडे दिले आहेत. दोनऐवजी एक कपच चहा प्या, कार्यालयात एसीचा वापर कमी करून बाहेर पडताना कार्यालयातील वीज बंद करावी अशा सूचना केल्या आहेत.
रमीझ राजा यांनी असेही म्हटले आहे की, मी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून खर्चाची कपात कशी करायची याबद्दल बरेच शिकलो आहे. आपला क्रिकेट संघ एक नंबरचा बनला पाहिजे. जर तसे नसेल तर आपल्या इथे असण्याला काहीच अर्थ नाही, असे राजा यांनी म्हटले आहे. बोर्डातील अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाला रमीझ राजा म्हणाले आहेत की, ‘तुम्ही आता दोनऐवजी एकच कपच चहा घेतला पाहिजे. एसीचा वापर कमी केला पाहिजे. तसेच बाहेर पडताना कार्यालयातील वीज बंद केली पाहिजे.’ त्यांनी तळागाळातील क्रिकेट सुधारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या खेळपट्ट्या सुधारल्या पाहिजेत. त्यामुळे तरुण क्रिकेटपटूंना चांगले प्रशिक्षण घेता येईल. लाहोर गद्दाफी स्टेडियमच्या गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलताना रमीझ राजा यांनी या सूचना केल्या आहेत.