डोव्हर – ट्विटरसोबत ४४ बिलियन डॉलर्सचा करार मोडणाऱ्या एलन मस्क यांना ट्विटरने न्यायालयात खेचले आहे. या प्रकरणात डेलावेअरच्या न्यायाधीशांनी मंगळवारी एलन मस्क यांना झटका दिला. मस्क यांनी या खटल्यासाठी फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली होती. मात्र डेलावेयर कोर्ट ऑफ चांसरी येथे झालेल्या पहिल्या सुनावणीत न्यायालयाचे चान्सलर कॅथलीन मॅककॉर्मिक यांनी या खटल्यावरील ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होईल, असा आदेश दिला. ही सुनावणी पाच दिवसांची असेल.
एलन मस्क यांनी १४ एप्रिल रोजी ट्विटरसोबत झालेल्या ४४ बिलियन डॉलरच्या कराराबाबत घोषणा केली होती. त्यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला होता. मात्र काही काळापासून त्यांचा ट्विटरसोबत वाद सुरू होता. त्यातून अखेर ८ जुलै रोजी मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र ट्विटरवर किती फेक अकाउंट आहेत, याची अचूक माहिती कंपनीला देता न आल्याने आणि करारदरम्यान ज्या अटी घालण्यात आल्या होत्या, त्यांचे उल्लंघन झाल्याने मस्क यांनी हा करार रद्द केल्याची चर्चा आहे. मात्र याप्रकरणी ट्विटरने मस्क यांना न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला. ‘आम्हाला हा करार पूर्ण करायचा आहे. हा करार करताना ज्या अटी घातल्या होत्या, त्यानुसार ठरलेली किंमत देऊन मस्क यांना तो पूर्ण करावाच लागेल. यासाठी आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करू’, असे ट्विटरने म्हटले होते. न्यायालयात आम्ही हा दावा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता आणि अखेर ट्विटरने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणातील खटला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ठेवण्याची मागणी ट्विटरकडून करण्यात आली होती. तर, एलन मस्क यांच्यानी फेब्रुवारीमध्ये दोन आठवड्यांची सुनावणी ठेवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या खटल्यावरील सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.