सातारा – गेल्या ३ ते ४ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले झाले आहे. मात्र या ऐन पावसाळ्यात
सातारा जिल्ह्यातील माण, वाई, पाटण, जावली, सातारा व कराड तालुक्यातील १६ गावे व ३९ वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.
सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यातही टँकर सुरू आहेत. सध्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पण पूर्वीचा भाग कोरडा आहे.पाटण तालुक्यातील जंगलवाडी, जाधववाडी, चव्हाणवाडी, फडतरवाडी, घोट, आंब्रुळकरवाडी,भोसगाव या वाड्या मधील १ हजार ७५९ नागरिकांना व ८४३ जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.जावली तालुक्यातील गवडीमधील २ हजार ५३२ नागरिकांना व १ हजार १०२ जनावरांना २ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
सातारा तालुक्यातील जांभगाव व आवाडवाडी येथील १ हजार ४९० नागरिकांना व ३४० जनावरांना २ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.कराड तालुक्यातील वानरवाडी, बामणवाडी येथील २ हजार ३७५ नागरिक व १ हजार ५१६ जनावरांना २ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी भरण्यासाठी सुमारे २० विहिरी व १६ विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.माण तालुक्यातील पाचवड, पांगरी, बिजवडी, वडगाव, वारुगड या ५ गावांसह २८ वाड्या वस्त्यांमधील ७ हजार ३०८ नागरिकांना आणि वाई तालुक्यातील मांढरदेव,
गडगेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी, कासुर्डेवाडी, गुंजेवाडी, ओहळी या गावांसह २ वाड्यामधील ५ हजार ३८१ नागरिकांना व ३ हजार २६२ जनावरांना २ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.