भुवनेश्वर – ओडिशात मोठे राजकीय फेरफार होण्याची चिन्ह दिसत असून ओडिशाच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. नवे मंत्री उद्या राजभवनात शपथ घेण्याची शक्यता आहे. . ब्रजराजनगर पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाचा (बीजेडी) झालेला मोठा विजय आणि नवीन पटनायक सरकारच्या पाचव्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल होऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यांना प्रमुख संघटनात्मक कार्यभार सोपवले जाऊ शकते. 2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या टीमसाठी नवीन चेहरे निवडले जातील, कारण काही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. नवीन कॅबिनेट मंत्री रविवारी राजभवनात शपथ घेऊ शकतात. प्रदिप आमट आणि लतिका प्रधान यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.राज्य सरकारची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांना पक्षातून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. फेरबदलावेळी पक्षनेतृत्वाकडून पक्षातील नेत्यांच्या कामाचा विचार केला जाऊ शकतो. हे नेत्यांना माहित असल्याने तेही आपली मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करत आहेत.