पणजी – कन्नड अभिनेता दिग्नाथ याला गोव्यात कुटुंबियांसोबत सुट्टी घालवताना व्यायम करणे चांगलेच महागात पडले. बॅकफ्लिप करताना त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याचे कळते आहे. ३८ वर्षीय दिग्नाथला तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी त्याला बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात हलवले. त्यासाठी गोवा सरकारच्या मदतीने विशेष जेटची व्यवस्था करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता गोव्यात कुटुंबियांसोबत वेळ घालवत होता. काल, मंगळवारी सकाळी दैनंदिन व्यायमाचा भाग म्हणून त्याने बॅकफ्लिप केले परंतु दुर्दैवाने तो डोक्यावर पडला आणि त्याच्या मानेला व पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला गोव्यातील रुग्णालयात नेल्यानंतर एका खाजगी जेटने त्याला बंगळुरूला आणण्यात आले. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास बंगळुरूच्या विमानतळावरून रुग्णवाहिकेने दिग्नाथला मणिपाल रुग्णालयात नेले.
दरम्यान, यापूर्वी २०१७ मध्ये तिकिट टू बॉलिवूड या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती. दिग्नाथने २००६ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने ३५ हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. सध्या तो १२ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या गालीपता २च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.