चित्रदुर्ग : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी आज कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील श्री मुरुगा मठाला भेट दिली आहे. त्यामुळे लिंगायत समाजासाठी राजकीय समीकरणे बदलणार का याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून इथे आपला मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरु असतानां राहूल गांधी यांनी या मठाला दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील मुरुगा मठ हा लिंगायत पंथाचा एक प्रसिद्ध मठ आहे. राहुल गांधी यांनी आज येथे मठाचे प्रमुख डॉ शिवमूर्ती मुरूगा शरणरू स्वामी यांची भेट घेतली. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मठाच्या मुख्यांनी त्यांना इष्टलिंग दीक्षा दीली आणि नियमाप्रमाणे, त्यांच्या डोक्यावर भभूताचे त्रिपुण्ड लावले. मुरुगा मठ हा लिंगायत समाजासाठी मोठे श्रद्धास्थान मानले जाते. म्हणून राजकीय वर्तुळात काही बदल होऊ शकतात अशी कुजबुजही सुरु झाली आहे. राहुल गांधी यांना इष्टलिंग दीक्षा दिली जात असताना, मठाच्या वतीने, राहुल गांधी लिंगायत पंथाची दीक्षा घेत आहेत, हा एक एतिहासिक क्षण आहे, अशी घोषणाही करण्यात आली.