मंगळुरु – कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुल्लाई तालुक्याच्या विविध भागात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. कालही कर्नाटकात 4.6 रिस्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याचे धक्के सोलापूर जिल्ह्यातही जाणवले होते. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचे धक्के बसले.
सुल्लाई तालुक्याच्या संपाजे आणि जवळपासच्या भागातील अरंटोडू, थोडीकाना, चेंबू आणि कल्लापल्ली येथील रहिवाशांना सकाळी 6.23 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावरही भूकंपाच्या पोस्ट्स दिसू लागल्या. संपाजे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जी के हमीद यांनी सांगितले की, मोठा आवाज होऊन काही काळ जमीन हादरली. अलिकडच्या काळात जाणवलेल्या भूकंपापेक्षा हे धक्के अधिक तीव्र होते. एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीनंतर या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 25 जून ते 1 जुलै दरम्यान सुलिया आणि शेजारच्या कोडागु जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.