बंगळुरू- अनेकदा समज देऊनही शाळा-कॉलेजमधील हिजाब बंदी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सरकारी कॉलेजच्या ६ मुस्लिम विद्यार्थिनींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या एका ठिकाणी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ विद्यार्थिनींना कॉलेजमधून परत पाठवण्यात आले.
कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी आहे. तिचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर अनेक शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा विद्यार्थिनींना शाळा प्रशासन समज देत आहे. मात्र त्यानंतरही हिजाब परिधान करणाऱ्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सरकारी कॉलेजमधील ६ विद्यार्थिनींना ६ दिवसांसाठी निलंबित केले आहे. दुसऱ्या एका घटनेत हमपनकट्टेजवळील बंगळुरू विद्यापीठ महाविद्यालयात हिजब घालून १६ विद्यार्थिनींनी वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना घरी परत पाठवण्यात आले. या विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश नाकारल्या बद्दल जिल्हा आयुक्तांकडे तक्रार केली आहे.