डोंबिवली- भाडेवाढ आणि रिक्षा चालकांच्या इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे १ ऑगस्टपासून बेमुदत पुकारण्यात येणाऱ्या संपात सहभागी न होण्याचा निर्णय कल्याण,डोंबिवलीतील ११ रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.दोन वर्षात कोरोना काळात रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी झाली. या संकटातून रिक्षा चालक अद्याप बाहेर आले नाहीत. त्यामुळे आर्थिक कोंडी, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संपात सहभागी होणार नाही, असे रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संप काळात कल्याण, डोंबिवलीतील रिक्षा सुरू राहणार असल्याने संप पुकारणाऱ्या संघटनेपासून रिक्षा चालकांना रिक्षा बंद ठेवण्यासाठी उपद्रव होऊ शकतो. यादिवशी रिक्षा चालकांना संरक्षण देण्याची मागणी रिक्षा संघटनांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे केली आहे.भाडे वाढ आणि रिक्षा चालकांच्या इतर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. कोकण विभागातील रिक्षा या संपात सहभागी होणार आहेत. कल्याण,डोंबिवलीतील ११ विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप कामगार महासंघ प्रणित रिक्षा संघटना, लाल बावटा रिक्षा संघटना, रिक्षा चालक मालक युनियन या संघटना संपात सहभागी होणार नाहीत.बहुतांशी चालकांचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे.कोरोना काळात दोन वर्षात रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले.अनेकांना कर्जाचे हप्ते फेडता आले नाहीत.मुलांचा शालेय खर्च असे अनेक खर्च चालकांसमोर आहेत.एक दिवस रिक्षा बंद ठेवली तर तेवढा आर्थिक खड्डा पडतो. तो लवकर भरून येत नाही. त्यामुळे सोमवारच्या संपात सहभागी न होण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे दत्ता माळेकर,काळू कोमास्कर, महेश आवारे,संजय मांजरेकर, संजय पवार यांनी दिली.दरम्यान, विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन रिक्षा संघटनांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन आ. रवींद्र चव्हाण यांनी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रश्न मार्गी लागणार असेल तर संप करुन प्रवाशांना त्रास देण्यात अर्थ नाही,असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.