मुंबई – मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवणे वेळखाऊ असून व्यवहार्य नाही, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याबाबत माहितीच्या अधिकारात सोमय्या यांनी माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना कांजूरमार्ग कारशेडसाठी योग्य नसल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
मेट्रोच्या कारशेडविषयीची माहिती किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मागितली होती. त्यासाठी त्यांनी ४ जुलै २०२२ रोजी अर्ज केला होता. त्याला एमएमआरडीएने उत्तर पाठवले आहे. त्यात त्यांनी कांजूर कारशेड एकापेक्षा अधिक मेट्रोसाठी वापरणे योग्य नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असे स्पष्ट होते. मेट्रो-३ व कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गला व्हावे अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली होती. त्यानंतर या जागेच्या मालकीचा वाद न्यायालयात गेला. केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे कांजूर कारशेडचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच कांजूरला कारशेड हलवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय त्यांनी रद्द केला. त्यानंतर आता पर्यावरणप्रेमींनी आरेतील कारशेडला विरोध केला आहे. आरेतील ८०० एकर जागा ठाकरे सरकारने जंगल म्हणून घोषित केली आहे. त्यात किरीट सोमय्या यांना एमएमआरडीएने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्प योग्य व व्यवहार्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या निर्णयाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.