पणजी – ११ पैकी ८ आमदार भाजपात प्रवेश करणार अशा जोरदार चर्चांनी गोवा काँग्रेसची धाकधूक वाढलेली असतानाच आज गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. यादरम्यान गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘आमच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले असून त्या आधारावर आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करत आहोत’, असे म्हटले. मायकल लोबो आणि दिगंबर कामत या दोघांनी आपण अजूनही काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासांतच पाटकरांचे हे वक्तव्य आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावर स्पष्टीकरण देताना पाटकर म्हणाले, ‘विधानसभेत पक्ष आपले ज्येष्ठ आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांना अपात्र ठरवण्याची मागणी करेल, ज्यांच्यावर राज्य विधानसभेतील ११ पैकी ८ आमदारांच्या पक्षांतरासाठी भाजपासोबत कट रचल्याचा आरोप आहे. पक्षविरोधी कारवाया करणे म्हणजे पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखे आहे. परंतु आता त्यांची भूमिका बदलली कारण त्यांना दोन तृतीयांश संख्या मिळू शकली नाही’, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर पाटकर यांनी आमदार संकल्प आमोणकर, कार्लोस फरेरा, रुडोल्फ फर्नांडिस, ऑल्टो डिकोस्टा आणि राजेश फळदेसाई यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांची भेट घेऊन काँग्रेसने लोबो यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवल्याने त्यांची विधानसभेतील जागा बदलण्याची विनंती केली. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, ज्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन मायकल लोबो यांना गटनेतापद आणि विरोधी पक्षनेतेपदावरून हटवल्याची घोषणा केली होती. ते दिनेश गुंडू राव आणि आमदार एलेक्सो सिक्वेरा हे पाटकरांसोबत अध्यक्षांकडे गेलेल्या शिष्टमंडळात सहभागी नव्हते.
दरम्यान, एकीकडे गोवा काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपात प्रवेश करणार, अशी पूर्ण शक्यता वर्तविण्यात येत असतानाच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खासदार मुकुल वासनिक यांना गोव्यात पाठवले आहे. तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सांगितले: ‘आम्हाला कोणाचीही गरज नाही. आमचे २५ आमदारांच्या पाठिंब्याने स्थिर सरकार आहे.’ भाजपाने काँग्रेसच्या आठ आमदारांना पक्षांतर करण्याचा कट रचल्याच्या काँग्रेसच्या आरोपांबाबत ते म्हणाले, ‘त्यांच्याकडे दुसरे काही नाही म्हणून ते इथे येऊन आम्हाला दोष देतात.’ दरम्यान, मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई यांनी प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिल्याची चर्चा आहे.