मुंबई – पावसाळ्यात डासांपासून पसरणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करणे प्रचंड गरजेचे असते. अशातच मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जूनच्या पहिल्या पाच दिवसांत मलेरियाचे ५७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच डॉक्टरांनी रुग्णांना ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखी, उलट्या व जुलाबाची तक्रार असल्यास उपचारात विलंब टाळण्याचा इशारा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा ५ जूनपर्यंत मुंबईत मलेरियाचे ९५०, तर डेंग्यूचे ९४ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, यासंदर्भात मृत्यूची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या कार्यवाहक आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, ‘आम्ही रोगाचा स्रोत शोधण्यासाठी सर्व मलेरिया प्रकरणांची वैयक्तिकरित्या तपासणी करत आहोत. कोविड-19च्या भीतीमुळे अनेक लोक ताप आणि अंगदुखी यांसारख्या लक्षणांसह रुग्णालयात धाव घेत आहेत, ज्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार होण्यास मदत होते.’