जळगाव – नुकताच अमळनेर आगारातील एसटी बसचा मध्य प्रदेशात नर्मदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की याच आगारातील वाहक मनोज पाटील या अपघातातून सुदैवाने बचावले असेच म्हणावे लागेल. कारण मनोज पाटील हे या गाडीवर ड्युटी करण्यासाठी आग्रह धरून बसले होते, मात्र ऐनवेळी त्यांनी आपला आग्रह मागे घेतला. त्यामुळे त्यांच्याबाबत काळ आला होता…पण वेळ आली नव्हती अशीच गत झाल्याचे दिसून येत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरला गेलेल्या या गाडीवर वाहक म्हणून प्रकाश चौधरी यांनी नियमानुसार ड्युटी लावली होती. परंतु या ड्युटीसाठी सुरुवातीला मनोज पाटील यांनी आग्रह धरला होता. मात्र नंतर त्यांनी आपला आग्रह सोडला आणि प्रकाश चौधरी आपल्या ड्युटीवर गेले. प्रकाश चौधरी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळली त्यावेळी मनोज पाटील यांना काळजात धस्स झाल्यासारखे वाटले. आपल्यावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच की काय आपण ती भूमिका बदलली, असे मनोज पाटील यांना वाटले. तर दुसरीकडे आपला एक सहकारी आज आपल्यातून कायमचा निघून गेला याची वेदना मनाला टोचू लागली होती. विशेष म्हणजे मनोज पाटील मुळातच परोपकारी स्वभावाचे आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्या अनेक सहकाऱ्यांना मदत केली आहे.