सातारा – जागतिक वारसा स्थळ असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो प्रकारच्या फुलांच्या जाती आढळून येतात. कास पठार हे कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे.हेच कास पठार आता तेथील नवीन पर्यटन स्थळांसह आज १ ऑगस्टपासून सर्व पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र यासाठी प्रवेश शुल्क म्हणून ३० रुपये आकारण्यात येणार आहे. तर फुले असणार्या क्षेत्रात प्रवेश करण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी पर्यटन हंगामात पठाराव पर्यटक गर्दी करण्याची शक्यता आहे. नुकतीच सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीची एक संयुक्त बैठक पार पडली.या बैठकीमध्ये कास पठार परिसराला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क म्हणून ३० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या पठार परिसरात असलेली नैसर्गिक मंडपघळ,प्राचिन शिवकालीन गुहा, कुमुदिनी तलाव,सज्जनगड पॉईंट, कास तलाव तसेच लाकडी मनोरा आणि छोटा धबधबा ही दुर्लक्षित असणारी नवीन पर्यटन स्थळेसुद्धा पर्यटकांना पाहता येणार आहेत. दरम्यान,कास पठार वनसमिती ही नेहमीच इथली वनसंपदा आणि नैसर्गिक फुलांचे जतन करत आली आहे.त्यामुळे पर्यटकांनी फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटकांनी प्रवेश न करता वन विभागाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कास पठार कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष दत्ता कीर्दत यांनी केले आहे.
कास पठार हे तेथील रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठारावर हजारो जातींची फुले आहेत. त्यातील अनेक जातींची तर आपल्याला नावेही माहित नाहीत.पावसाळ्याच्या दिवसात विशेष: ऑगस्टनंतर हे पठार फुलांनी बहरून जाते.मोठ्या संख्येने पर्यटक कास पठाराला भेट देण्यासाठी येत असतात. म्हणूनच कास पठाराचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.