कुवैत सिटी – कुवैतमधील एका सुपरमार्केटने भारतीय उत्पादने न विकण्याचा निर्णय घेतला आहे. नुपूर शर्मा यांचे वक्तव्य इस्लामविरोधी असल्याचे सांगत या सुपरमार्केटने भारतीय उत्पादने हटवली आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सौदी अरेबिया, कतार आणि इतर आखाती देशांनी तीव्र निषेध केला आहे. आता कुवैतमधील अल अरदिया को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्टोअर्समधून भारतीय चहा आणि इतर उत्पादने रॅकमधून काढून टाकण्यात आली आहेत. तसेच तांदळाच्या पिशव्या, मसाले आणि मिरची उत्पादनांवर कापड टाकून या वस्तू विकल्या जाणार नाहीत, असा बोर्ड लावण्यात आला आहे. अरबी भाषेत हा बोर्ड लिहिला असून ‘आम्ही भारतीय उत्पादने विकणार नाही’, असे या संदेशात लिहिण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपाकडून नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर केलेल्या विधानाचे पडसाद देशातही उमटत असून नुपूर शर्मा यांच्या विधानाशी आपला संबंध नसल्याची भूमिका केंद्र सरकार आणि भाजपाने घेतली आहे.