ठाणे- मराठी अभिनेत्री केतकी चितळेला आज ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानास्पद फेसबुक पोस्ट केली होती. यामुळे तिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. तिच्या या वक्तव्याच्या सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केले होते. तसेच त्यांना भ्रष्ट संबोधले होते. यामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. वाढता वाद पाहून केतकी चितळे हिला अटक करण्यात आली होती. आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर केतकीला 14 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर 18 मे पासून केतकी न्यायालयीन कोठडीत होती. तिच्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएम पटवर्धन यांनी सुनावणी केली. गुन्हे शाखेने आधीच जामीन अर्जाला विरोध करीत उत्तर दाखल केले होते. काल केतकीच्या जामीन अर्जाला पोलीस विरोध करीत नसल्याचे सांगत अतिरिक्त जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार आज न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.