मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘कॉन बनेगा करोडपती १४’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. हा नवा सिझन ८ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. या सिझनच्या पहिल्या भागात अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान बसणार आहे. आता तो किती प्रश्नांची अचूक उत्तरे देणार याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने या पर्वात खास ७.५ कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचे उत्तर चुकल्यास स्पर्धकाला ७५ लाख रुपये मिळतील.
दरम्यान, आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर जवळपास चार वर्षांनंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो केबीसीमध्ये सहभागी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूरदेखील या मंचावर उपस्थित असेल. त्यांची प्रमुख भूमिका असलेला, अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंह चड्ढा ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.