संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 17 August 2022

केरळनंतर दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण; WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – केरळपाठोपाठ आता राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला आहे. मुख्य म्हणजे या रुग्णाने कोणताही परदेशी प्रवास केलेला नाही. याबाबत आता आरोग्य विभागाने तपास सुरू केला आहे. पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीला ताप आणि त्वचेवर जखमा अशी लक्षणे दिसून लागली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीत मंकीपॉक्सचा हा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे भारतात आता दिल्लीसह मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. उर्वरित तीन प्रकरणे केरळमधील असून तिघेही परदेशातून परतले होते. दरम्यान, डब्लूएचओने मंकीपॉक्ससंदर्भात जगात शनिवारी आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

गेल्या 8 दिवसात केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळले होते. भारतातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण 12 जुलै रोजी कोल्लममध्ये आढळला होता. संक्रमित व्यक्ती यूएईमधून आली होती. दुसरे प्रकरण कन्नूरमध्ये दुसऱ्याच दिवशी समोर आले. तो दुबईहून आला होता. केरळमधील ३५ वर्षीय तरुण ६ जुलै रोजी यूएईहून मलप्पुरमला परतला होता. 13 जुलैपासून त्याला ताप येत आहे. या तरुणावर तिरुअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, संक्रमित तरुणांच्या संपर्कात असलेल्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याने घाबरण्याची गरज नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये विलगीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळांवर हेल्प डेस्क उभारण्यात आले आहेत. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.

खबरदारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनॉम घेब्येयियस यांनी शनिवारी सांगितले की, वेगाने पसरणारा मांकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणी दर्शवतो. जागतिक आरोग्य आणीबाणी हा जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वोच्च पातळीचा इशारा आहे. आता मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याची गरज आहे. यासोबतच, लस आणि उपचार यासाठी निधी आणि जागतिक प्रयत्नांची गरज आहे. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे प्रभावी माहिती आणि सेवा तयार करणे आणि वितरित करणे अत्यावश्यक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami