मुंबई – नेहमी शांत असणारा समुद्र पावसाळ्यात रौद्ररुप धारण करतो. किनाऱ्यावरील नागरी वस्तीला त्याच्या रौद्ररूपाचा मोठा फटका बसतो. आता यंदाच्या पावसाळ्यात कोकणातील समुद्रात २६ वेळा मोठे उधाण येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे. त्यामुळे त्या काळात मच्छिमारांनी, नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
यंदा मान्सूनला महाराष्ट्रात यायला उशीर होणार असला तरी अनेक ठिकाणी अधूनमधून पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. तसेच यंदा पावसाळ्यात जूनमध्ये ६ वेळा, जुलैमध्ये ७ वेळा, ऑगस्टमध्ये ७ वेळा आणि सप्टेंबरमध्ये ६ वेळा मोठे उधाण येणार आहे. उधाणाच्या काळात समुद्राच्या आणि खाडीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी या काळात दक्ष राहून आपले संरक्षण करणे गरजेचे आहे.
१४ जून ते १८ जून असे सलग ५ दिवस मोठ्या भरतीचे असून यादरम्यान २ मीटरपेक्षा उंच लाटा समुद्रात उसळणार आहेत. तर, ३० जून रोजी दुपारी समुद्राला मोठी भरती येणार असून दोन मीटरपेक्षा उंच लाटा उसळतील, असा अंदाज आहे. तर, १३ जुलै ते १७ जुलैदरम्यान मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात २ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच ३० आणि ३१ जुलै हे दोन दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत. त्यानंतर ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात मोठी भरती येईल. त्यावेळी समुद्रात २ ते सव्वादोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तसेच २९ आणि ३० ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे. तर, सप्टेंबर महिन्यात ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर हे उधाणाचे दिवस असतील, अशी शक्यता आहे.