नवी दिल्ली – कोरोना काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला, अनेकांनी जवळची माणसं गमावली. यातून काहीजण सावरले, तर काहीजण स्वतःला वाईट मार्गावर जाण्यापासून आवरू नाही शकले. दिल्लीतील अशाच एका व्यक्तीने कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे मोबाईल चोरीचा व्यवसाय सुरू केला. नानग्लोई भागात राहणाऱ्या या चोरट्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव अस्लम असे असून त्याच्याकडून तीन मोबाईल आणि एक स्कूटर जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी एका महिलेने आपला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ‘मी किराणा दुकानातून सामान घेऊन येत असताना एकाने माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि नानग्लोईच्या दिशेने निघून गेला’, अशी तक्रार सदर महिलेने केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सीसीटीव्ही कॅमेराच्या आधाराने ३७ वर्षीय अस्लमला अटक केली. लॉकडाऊन काळात नोकरी गमावल्याने अस्लम व्यसनाच्या आहारी गेला, पैशांची चणचण भासू लागल्याने त्याने मोबाईल चोरी सुरू केली, असे पोलीस चौकशीतून समोर आले. दरम्यान, या घटनेतून मेहनतीला पर्याय नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.