मुंबई – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत पार पडलेल्या बैठकीत जागतिक बँकेचे अधिकार्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्षांपासून पूर येत आहे. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेने सहमती दर्शवली असून या प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पावसाचे जे पाणी समुद्रात वाहून जाते आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही, ते गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता. हे काम काही दिवसांपासून रखडले होते. हा प्रकल्प परत सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी शेतकर्यांना या योजनेचा फायदा होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांना फायदा होणार आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगलीतील पूरसदृश्य भागातील लोकांना दिलासा मिळणार आहे.