पुणे – मागील सात-आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण वेगाने भरू लागले आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास या धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने पाठबंधारे विभागाने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मुठा नदीत ८५६ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली असल्याची माहिती खडकवासला धरण पाटबंधारे विभागाचे स्वारगेट उपविभागीय अभियंता योगेश भांडवलकर यांनी दिली.
विशेष म्हणजे काल सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ७५.६० टक्के भरलेल्या या धरणाचा पाणीसाठा काही तासांतच ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. काल या धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत होता. काल दिवसभरात या परिसरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत २२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे मुठा उजव्या कालव्यातून १००५ क्युसेक पाणी सोडण्यात आले. परंतु तरीही पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने धरणातील पाणीसाठा वाढू लागला. काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे परिसरातील चारही धरणांतील पाणीसाठा ९.४७ टीएमसी म्हणजेच ३२.४८ टक्के इतका झाला होता. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा २९.६२ टक्के इतका होता. काल सायंकाळी खडकवासला – ७५.६० टक्के, पानशेत – ३२.४२ टक्के, वरसगाव – ३० टक्के, टेमघर – १८.२९ टक्के असा एकूण चार धरणांतील पाणीसाठा ३२.४८ टक्के इतका होता. गेल्यावर्षी याच दिवशी हा पाणीसाठा २९.६२ टक्के इतका होता.