दिल्ली: महागाईमुळे त्रस्त होणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने तेल कंपन्यांना येत्या दोन आठवड्यात किंमती 10 रुपयांनी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खाद्यतेलांचे परीक्षण करण्यासाठी गुरूवारी खाद्य विभागाच्या सचिवांनी तेल कंपन्यांबरोबर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मे महिन्यानंतरची ही तिसरी बैठक होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्यामुळे त्याचा फायदा छोट्या बाजारांना सुद्धा होत आहे. अन्न सचिवांशी झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल सुमारे 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. इंडोनेशिया हा पाम तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. शिपमेंटवरील निर्बंध उठवल्यानंतर सूर्यफूल आणि सोया तेलांचा पुरवठा सुलभ झाला आहे. त्यामुळे जागतिक खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी एफईला सांगितले की उद्योगांना त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवावे लागतील. सरकारने तेलाचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फायदा जनतेला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमतीत घसरण होत असली तरी सणसमारंभावेळी तेलाच्या किंमती आणखी कमी होणे म्हणजे नागरिकांसाठी ती फायदेशी असणार आहे.