जळगाव – अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथून आठ किमी अंतरावर असणाऱ्या खापरखेडा येथील शेतकरी प्रमोद पाटील यांच्या उसाच्या शेतात काल दुपारी अचानक बिबट्या दिसून आल्याने एकच तारांबळ उडाली. यामुळे शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे.
पातोंडा येथील प्रमोद पाटील व त्यांची पत्नी हे सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास शेतात पिकांची पहाणी करण्यास गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या पुढ्यात बिबट्याने उडी घेत शेतात प्रवेश केल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.ही बाब पारोळा वनपरीक्षेत्र अधिकारी शामकांत देसले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची सत्यता पडताळून पाहिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतातील व परीसरातील पदचिन्हांची खात्री करून या पावलांच्या खुणा ह्या बिबट्याच्याच असल्याची खात्री करून तो तापी नदीच्या दिशेने गेला असल्याची माहिती दिली. वनविभागातील अधिकाऱ्यांनी गावात जाऊन गावकऱ्यांना व शेजारील गंगापूरी, नालखेडा, मठगव्हाण व नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.दरम्यान खापरखेडा शिवारात रान डूक्करांची शिकार करायला गेलेल्या इसमांपैकी दोन इसमांवर बिबट्याने प्राणघाती हल्ला केल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे.यापैकी एक गंभीर जखमी असल्याचे समजते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या अज्ञात इसमांचा शोध घेतला असता ते फरार झाले असल्याचे समजते.