बीड – गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटीलजवळ गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माऊली कृपा ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस आणि एसटी यांच्यात समोरासमोर जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये एसटी चालकाचा समावेश आहे. अपघातातील जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एसटी चालकाची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या अपघाताचे नेमके कारण समजलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
माऊली ट्रॅव्हलची बस नांदेड येथून पुण्याकडे जात होती. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ही बस गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटीलजवळ आली तेव्हा लातूर-नागपूर एसटी बसशी तिची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की, दोन्ही बसचा दर्शनी भाग उध्वस्त झाला. त्यात एसटी बस चालकासह २५ प्रवासी जखमी झाले. त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यातील १० जणांना नांदेड, आंबेजोगाई आणि परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींवर उपचार करण्यासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची ४ पदके तैनात केली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.