टोकियो – वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे कायदे, नियम आहेत. त्यामागे महत्त्वाचे तर्क असतात. अनेकवेळा काही देशांचे नियम विचित्र वाटतात. पण त्या त्या देशात ते बरोबर असतात. जसा की जपान हा अनेक विचित्र चालीरिती असलेला देश आहे. पण याच देशात असाच एक नियम पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते जपानमधील लोकांच्या रस्त्याने जाणाऱ्या स्वच्छ वाहनांवर रंगांचे बॉल फेकतात.
विशेषतः येथील पोलिसांनी केलेला हा एक नियम या लोकांनी देखील आपलासा केला आहे. जपानी पोलिसांननी पेंटचा बॉल चालत्या कार्सवर फेकण्यामागे काही कारण आहे. हा रंगाचा बॉल चालत्या वाहनावर फेकला की तो फुटतो आणि त्यातील रंगाचे डाग वाहनावर पडतात. पोलिसांची ही कृती गुन्हेगार पकडण्यास मदत होते. म्हणजे समजा एखादा गुन्हेगार कार मधून चालला असल्याची खबर मिळाली असेल तर त्याच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कार वर असे बॉल फेकले जातात. त्याचबरोबर एखादा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या वाहनावर सुद्धा असे बॉल फेकले जातात. त्यामुळे या रंगांचे वाहनावर पडलेले डाग पुढच्या नाक्यावर असलेल्या पोलिसांना दुरुनही दिसतात आणि त्यांना गुन्हेगाराला पकडणे सोपे होते. टोल, पेट्रोल पंप अश्या ठिकाणी गुन्हे करून पलायन करणाऱ्या गुन्हेगारांसाठी हा नियम अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे येथील पोलिसांचे म्हणणे आहे.