कोलंबो – श्रीलंकेतील गरिबीत उसळलेल्या जनतेच्या संतापामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यांना पळून जाण्यासाठी भारताने मदत केली, अशा बातम्या श्रीलंकेतील काही माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे तेथील जनतेत भारताविरोधात संताप निर्माण झाला. याची गंभीर दखल घेऊन भारताने हे वृत्त निराधार असल्याचे म्हणत आपण राजपक्षेंना अशी कोणतीही मदत केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ७३ वर्षीय राजपक्षे त्यांच्या कुटुंबासह बुधवारी देश सोडून लष्कराच्या विमानाने मालदीवला पोहोचल्याचे कळते आहे.
श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करून, ‘भारताने गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर काढण्यास मदत केल्याबाबतचे मीडिया वृत्त निराधार आणि निव्वळ अनुमान आहे’, असे म्हणत ते फेटाळून लावले. ‘लोकशाही मार्ग आणि मूल्ये, प्रस्थापित लोकशाही संस्था आणि संवैधानिक चौकटीच्या माध्यमातून समृद्धी, प्रगतीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत श्रीलंकेच्या जनतेला पाठिंबा देत राहील’, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी ट्विटच्या माध्यमातून केला.
High Commission categorically denies baseless and speculative media reports that India facilitated the recent reported travel of @gotabayar @Realbrajapaksa out of Sri Lanka. It is reiterated that India will continue to support the people of Sri Lanka (1/2)
— India in Sri Lanka (@IndiainSL) July 13, 2022
तर दुसरीकडे, श्रीलंकेच्या हवाई दलाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले, ‘सरकारच्या विनंतीनुसार आणि कायद्याने राष्ट्रपतींना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या पूर्ण मान्यतेने, राष्ट्रपती, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना १३ जुलै रोजी कातुनयके आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्यात आले. त्यांना मालदीवला जाण्यासाठी श्रीलंकन हवाई दलाची विमाने देण्यात आली.’
दरम्यान, श्रीलंका सध्या सात दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. ज्यामुळे लोकांना अन्न, औषध, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीत नव्या सरकारकडून अटक होण्याच्या भीतीने राजपक्षे यांना राजीनामा देण्यापूर्वी परदेशात जायचे होते, अशी चर्चा श्रीलंकन जनतेत सुरू आहे. त्याचबरोबर राजपक्षे मालदीवमधून दुसऱ्या देशात जाऊ शकतात, असेही म्हटले जात आहे.