नागपूर : नागपूरमध्ये एका गोदामामध्ये दरोडा टाकल्याप्रकारणी अटक केलेला आरोपी हा गोध्रा हत्याकांडप्रकरणी असल्याचे पोलीस तपासातून निषपन्न झाले आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी दिली आहे.
उमरेड पोलीस ठाण्यात एका दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपूरमधील एका गोदामामध्ये २३ जून रोजी दरोडा पडला होता. या दरम्यान पोलिसांना एक संशयित कंटेनर दिसला.त्यावेळी मुद्देमाल घेऊन आरोपी पळत असताना पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे आणि दोन कर्मचारी यांनी या कंटेनरचा पाठलाग केला होता. पांडे यांनी जवळपास १८ किलोमीटर पाठलाग केल्यानंतर गुन्हेगारांनी त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर पोलिसांवर हल्ला करुन आरोपींनी तिथून पळ काढला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागपूर ग्रामीण पोलिस करत होते. त्यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली. पोलीस चौकशीतून असे निषपन्न झाले की ही आंतरराज्य टोळी आहे. टोळीचा प्रमुख गोध्रा हत्याकांडातील आरोपी निघाला. या टोळीच्या प्रमुखाचे नाव उस्मान गनी मोहम्मद इब्राहिम काफीवाला (वय 55, रा. गोध्रा, गुजरात) असे आहे. 2002 साली गोध्रा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला आग लावण्याच्या प्रकरणात आरोपीने ८ वर्षांचा कारावास भोगला होता. उस्मान व्यतिरिक्त पोलिसांनी इरफान उर्फ जाफरू फारुख बांडी यालाही अटक केली आहे.