पणजी – महाराष्ट्रात राजकीय बंडखोरीची जखम ओली असतानाच आता गोव्यातही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोवा काँग्रेसमधील ८ विद्यमान आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते गोव्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे आता आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत भाजपा ऑपरेशन लोटस राबवणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि काँग्रेसचे इतर काही आमदार भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वासोबत लवकरच भगवा रंग धारण करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार आणि भाजपाचे शिर्ष नेतृत्व यांच्यात वाटाघाटी झाल्या असून आता केवळ पक्षप्रवेशासाठी वेळनिश्चीती बाकी असल्याचे समजते. परंतु दिंगबर कामत आणि मायकेल लोबो या दोघांनी मात्र ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. दरम्यान, काँग्रेस ११, भाजपा २०, एमजीपी २ आणि अपक्ष ३ असे सध्याचे गोवा विधानसभा पक्षीय बलाबल आहे.