मुंबई – विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल आज दुपारी १२.५५ वाजता मीरा रोड ते दहिसर दरम्यान बंद पडली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या जलद आणि धीम्या लोकलही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या.
बराच वेळ होऊनही लोकल पुढे जात नसल्याने आणि त्यामागील नेमके कारण प्रवाशांना समजू शकत नसल्याने प्रवाशांनी लोकलमधून उतरून रुळावरून चालत जवळचे स्थानक गाठले. पाऊस आणि त्यात रुळावरून चालत दहिसर स्थानक गाठताना प्रवाशांच्या नाकेनऊ आले. तोपर्यंत या मार्गावरील लोकल चर्चगेट दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम धीम्या लोकलच्या वेळापत्रकावरही झाला. लोकलमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांना अर्धा तास लागला. त्यामुळे डहाणू तसेच विरारहून येणाऱ्या जलद लोकल बरोबरच धीम्या लोकलचे वेळापत्रकही काहीसे विस्कळीत झाले असून लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या.मध्य रेल्वेवरील आसनगाव दरम्यानही लोकल सेवा विस्कळीत झाली. एलटीटीहून छापराला जाणारी गाडी क्रमांक 11059 दुपारी पाऊणच्या सुमारास आसनगाव स्थानकाजवळच थांबली. या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी एक तास लागला आणि ही गाडी पुढे रवाना करण्यात आली. त्यामुळे आसनगाव डाउन धीम्या मार्गांवर धावणाऱ्या लोकल उशिराने धावू लागल्या आहेत. याचा फटका या मार्गावरील लोकल प्रवाशांनाही बसला आहे.